Blog Detail

AMFI-Registered Mutual Fund Distributor

Page Title

Home / Blog / Marathi Blogs dont-withdraw-fund-investment

dont-withdraw-fund-investment

  April 2,2026

शेअर बाजारातील चढउतार हा बाजाराचा गुणधर्म आहे.  प्रॉफीट बुकींग शास्त्रीय पद्धतीने करण्याचे काम फंड मॅनेजरचे आहे. गुंतवणूक आपण फंड मॅनेजरकडे सोपविली आहे. त्यांस शांतपणे कार्य करू द्यावे. सातत्याने फंडातून आतबाहेर करणे हिताचे नाही. याप्रसंगी वरिष्ठ गुंतवणूक तज्ञ वॉरेन बफे यांचे विधान महत्त्वाचे आहे, 'बाजाराला 'टायमिंग' करण्यापेक्षा गुंतवणुकीस पुरेसा 'टाईम' देणे अधिक शहाणपणाचे आहे'.

सेन्सेक्स-निफ्टीच्या आकड्यांकडे वारंवार बघून आपल्या गुंतवणुकीशी खेळू नका. दीर्घकाळाच्या चक्रवाढ पद्धतीने तिला वाढू द्या. आजपर्यंत कुठलीही चार्टिस्ट व्यक्ती वा ट्रेडर जगातील गर्भ श्रीमंतांच्या यादीत दिसत नाही, मात्र अनेक गुंतवणूकदार श्रीमंत झालेले दिसतात. गुंतवणूक करताना आर्थिक ध्येये व काळ निश्चित करून गुंतवणूक केलेली असते, मात्र बाजारातील उलटसुलट बातम्या व 'पॅनिकनेस'मुळे अथवा गुंतवणुकीचे मूल्य वाढल्यावर हुरळून जाऊन गुंतवणूक मोडू नये. इतिहास सांगतो, बाजार आणि अर्थव्यवस्था नेहमी पुन्हा-पुन्हा उभारी घेत असतात. आपल्या गुंतवणूक सल्लागारांशी चर्चा करून गुंतवणुकीचे निर्णय घ्या आणि दीर्घकाळाच्या ध्येयांवर लक्ष केंद्रीत करा. तुमच्या 'विश्वासां'वर विश्वास ठेवा आणि तुमच्या 'संशयां'वर संशय घ्या. गुंतवणूकदारांच्या दीर्घकाळाच्या यशापासून नेहमीच वंचित ठेवणारी ही गुंतवणूकदारांची स्वतःची मानसिकता असते. आव्हानात्मक बाजारातील परिस्थितींमध्ये, शंका आणि भीती नेहमीच आपल्याला शॉर्ट टर्म निर्णयाकडे वळवितात आणि दीर्घकालीन गुंतवणुकीच्या नियोजनांच्या रुळांवरून खाली उतरवितात.

पहिली मानसिकता :

बाजार अधिक आकर्षक होण्यासाठी मी वाट बघितली पहिजे...

पण लक्षात असू द्या :

इतिहासाने स्पष्ट केले आहे की गुंतवणुकीची अगदी 'योग्य' वेळ निवडणे हे अशक्यापलिकडचे आहे. शिवाय बाजारात तेजी सुरू होण्याचे लक्षण म्हणजे चांगल्या बातम्या शोधणे नेहमीच कठीण आहे. बाजारात पडझड सुरु असताना स्वस्तात खरेदी केल्याने बाजाराच्या पुढील 'रिकव्हरी'मध्ये कसे फायदेशीर ठरते ते बघा. (उदाहरणार्थ मार्च 2009 मध्ये हटकून खरेदी करणाऱ्यास मे 2009 अखेर तब्बल 40%ते 80% सरळ वाढ मिळाली, तसेच कोविड काळात खरेदी करणाऱ्यास पुढील तीन वर्षांत दुप्पट वाढ मिळाली.)

दुसरी मानसिकता :

कॅशमध्ये गुंतवणूक परिवर्तित करणे अधिक चांगले ठरेल...

पण लक्षात असू द्या

'कॅश' कडे वळणे हे शॉर्ट टर्म साठी सुरक्षित पर्याय ठरू शकतो. तथापि, तेवढ्या काळातील 'महागाई' ही तुमच्या पैशाच्या खरेदी शक्तीला हानी पोहचवू शकते.

तिसरी मानसिकता :

माझ्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे मी बाजारातून माझी गुंतवणूक काढून घेतली पाहिजे...

पण लक्षात असू द्या :

गुंतवणूकदार अधाशीपणामुळे आणि उतावीळपणामुळे उंचावर खरेदी करतात आणि भीती, नैराश्यामुळे मंदीत विक्री करतात.... बास्तविक, त्यांनी याउलट कृती केली पाहिजे. गर्दीच्या 'शहाणपणा' मागे धावणे हे क्वचितच यशस्वी गुंतवणूक डावपेच का ठरते, यापासून शिका.

चौथी मानसिकता :

मी 'स्टॉक्स' मध्ये गुंतवणूक करणे थांबविले पाहिजे..... पण लक्षात असू द्या :

एक उत्तम डायव्हर्सिफाइड पोर्टफोलिओ विविध तऱ्हेने बाजारास सामना करतो. एकाच ॲसेट्स वर्गात भरपूर किंवा अति कमी गुंतवणूक म्हणजे खडकाळ प्रवास होय. बाजाराच्या चढउताराच्या अवस्थांमध्ये एखादा चांगला डायव्हर्सिफाइड पोर्टफोलिओ चढउतारांवर कसे स्वार होण्यास मदत करतो ते लक्षात घ्या.

 

📌 ही माहिती फक्त शिक्षणासाठी आहे. हे गुंतवणूक सल्ला नाही. म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन असते. सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

Tags : ,

Image by Freepik | Icon by Flaticon